Tuesday, 1 November 2016

काका पुतणे आणि भांडणे 2 : पत्रकार हेमंत जोशी


ज्या काकांनी घडविले, मोठे केले, राजकारणात आणले, पद दिले, मान सन्मान मिळवून दिला, राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, फारसे कष्ट न करता लोकांना पुतण्यास नेता म्हणण्यास भाग पडले, थोडक्यात पैसे प्रतिष्ठा पब्लिसिटी सारेकाही विनायसे मिळवून दिले, कायम संगतीला ठेवून पुतण्याला आधी राजकारणात आणले नंतर लगेच योग्य स्थान आणि भरपूर मानसन्मान मिळवून दिला तरीही या राज्यातले तमाम ' मराठी ' काका पुतणे दर्डा किंवा संचेती कुटुंबासारखे एकमेकांना घट्ट पकडून का राहिले नाहीत, राजकीय घराण्यातले जवळपास सारे पुतणे काकांशी पंगा घेऊन, गरज पडली तर दंगा करून काकाबाहेर का पडले त्यात नेमकी अधिक चूक कोणाची होती, काकांची कि पुतण्याची आणि हे नेमके फक्त मराठी माणसाच्या घराण्यातच का घडते, अमराठी म्हणजे शेठजी बघा व्यवसायात असोत कि राजकारणात, एकमेकांना कसे तहहयात घट्ट बिलगून असतात, आपल्यात तो गूण का टिकला नाही, काका पुतणे राजकारणातले नेहमी एकमेकांना संपवायला का निघतात किंवा निघाले आहेत मग ते शिवाजी महाराजांच्या घराण्यातले उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले असोत कि सुनील आणि अवधूत व संतोष तटकरे, नव्या मुंबईतले नाईक घराणे असो कि साक्षात दिवंगत बाळासाहेब 
आणि राज ठाकरे, मनोहर आणि निलय यांचे पुसद मधले नाईक घराणे असो कि नागपूर काटोल मतदार संघातले अनिल देशमुख आणि त्यांचा पुतण्या आणि चक्क काका अनिल देशमुख यांचा पराभव करून निवडून आलेला पुतण्या आमदार आशिष देशमुख असोत. या देशमुखांकडे तर वेगळीच राजकीय परिस्थिती आहे, रणजित देशमुख मंत्री असतांना त्यांनी धाकटे चुलत बंधू श्रीमान अनिल  देशमुख यांना स्थानिक राजकारणात मुद्दाम आणले, त्यांना त्याकाळी पदे आणि पदके मिळवून दिल्लीत, पुढे अनिलबाबू आणि रणजितबाबू या दोघात राजकीय वैमनस्य आले, रणजित सत्तेच्या राजकारणातून अडगळीत गेले आणि अनिलबाबू त्यांच्या छातीवर पाय ठेवून तब्बल 20/22 वर्षे मंत्रिपद उपभोगते झाले, प्रचंड अमीर देखील झाले, पुढे त्यांच्या स्वार्थी वृत्तीचा अतिरेक मतदारांना भावला नाही, काटोलकर मतदारांनी अनिलबाबुंच्या राजकारणात नवख्या असलेल्या पुतण्याला म्हणजे रणजित देशमुख यांच्या मुलास निवडणून आणले, आशिष आमदार झाले, यावेळी आमदार आहेत, सिनेमासारखे खून का बदला खून जणू असे घडले...


काका वरचढ आहेत म्हणून पुतण्या गप आहे अन्यथा शरद पवारांच्या घरातही तेच घडले असते जे निलंगेकरांच्या घराण्यात घडले. भुजबळांच्या घराण्यात देखील पुढल्या काही महिन्यात तेच घडले असते जे नाशिककर हिरे घराण्यात घडले म्हणजे जसे बळीराम हिरे आणि प्रशांत हिरे या काका पुतण्यात कमालीची राजकीय खुन्नस आणि नात्यातले वैमन्यस्य होते तेच नेमके छगन आणि समीर भुजबळ यांच्यातही जवळपास घडायला सुरुवात झाली होती, भांडणाची सुरुवात दोघांच्या बायकांनी केव्हाच सुरु करवून दिली होती पण समीर आणि छगनराव यांचे व्यवहार एक होते आणि दोघेही सरकारी जाळ्यात अडकल्याची त्या दोघांनाही दोन वर्षे आधीच जाणीव झालेली असल्याने ते दोघे एकमेकांना घट्ट पकडून बसले, त्यादरम्यान भांडले असते तर सरकारला त्या दोघांची आर्थिक चौकशी करणे फार सोपे गेले असते, थोडक्यात काकाने पुतण्याच्या आणि पुतण्याने काकाच्या भानगडी सांगितल्या असत्या, संकट आहे त्यापेक्षा त्यामुळे अधिक गडद झाले असते....


विदर्भात यवतमाळ आणि त्यालगत असलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला आहे, या समाजाला झाडाझुडुपातुन जंगलातून बाहेर काढून शिक्षित बनवून प्रतिष्ठा मिळवून देण्याचे सतत 60-70 वर्षे सातत्य राखले ते पुसदच्या नाईक घराण्यातील फक्त तीन राजकीय दिग्गजांनी थोडक्यात या तिघांनीच बंजारा समाजाला पुढे नेण्याचे त्यांना पैसे शिक्षण प्रतिष्ठा मिळवून देण्याचे अतिशय मोठे काम केले आणि हे तिघे होते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पुढे त्यांचे पुतणे दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि माजी मंत्री मनोहर नाईक, त्यामुळे आजही बंजारा समाजात या तिघांना साक्षात परमेश्वर समजल्या मानल्या पुजल्या जाते, नाईक घराण्यात इतर कोणीही पुढे त्या तोडीचे पुढे आले नाही, या सर्वांच्या मुलांच्या वागण्यात कमालीच्या राजकीय मर्यादा असल्याने, वसंतराव नाईकांच्या मुलास, अविनाश यास एकदा शरद पवारांनी राज्यमंत्रीपद दिलेही होते पण बलराज सहानी यांचा परीक्षित जसा बापाची जागा अभिनयात घेऊ शकला नाही, जे शम्मी कपूरच्या पुतण्याचे म्हणजे राजीव कपूरचे झाले, तेच वसंतरावांच्या चिरंजिवांचे झाले, नंतर तो लवकरच राजकारणातून एखाद्या जादूगारासारखा एकदम गायब झाला. सुधाकरराव नाईक यांचा एकुलता एक जय पुसदला शेती आणि शैक्षणिक संस्था सांभाळतो आणि मनोहर नाईक यांची दोन्ही मुले आधी आराम करतात नंतर बापाने जे थोडेफार कमावून ठेवले आहे, तोच तो हिशेब तपासून बघतात. नाईक घराण्यात खऱ्या अर्थाने अगदी सुरुवातीपासून ठरवून राजकीय लुडबुड केली ती मनोहर आणि सुधाकरराव नाईक यांचे जे मधले भाऊ होते, मधुकरराव, त्यांच्या मुलाने म्हणजे निलय नाईक यांनी, मुलाचे राजकीय पाय अगदी सुरुवातीपासून या तिघंही भावांना पाळण्यात दिसत होते म्हणून मनोहर नाईक यांनी निलय सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर त्याला यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बहाल केले, पण निलय यांनी अधिक श्रीमंत होण्याची ज्यादा घाई केली,आणि तेथेच निलय चुकले, त्यांना मोठी संधी होती, राजकीय लोकप्रियता मिळवून मोठे नेतृत्व या राज्याला बहाल करण्याची, कारण निलय बुद्धिमान आहेत, उच्च शिक्षित आहेत, मितभाषी आहेत, बोलके आहेत पण सुरुवातीला त्यांचा पाय घसरला आणि दोन्ही काकांनी त्यांना अलगद राजकारणाबाहेर काढले, तेथून पुतणे निलय नाईक यांची सटकली त्यांनी आपल्याच घरी हळूहळू बंडाचा झेंडा हाती घेतला पण निलय यांना कधीही लोकाश्रय मिळाला नाही ते लक्षात आल्यानंतर निलय यांनी अधून मधून मनोहर नाईक यांच्याशी जुळवूनघेतले पण वेळ निघून गेली होती, मनोहर नाईकांची मुले तोपर्यंत मोठी होऊन बापाला बिलगून मजा मारायला लागली होती, त्यामुळे निलायचे स्थान केवळ मनोहर नाईक यांची भेटगाठ मिळण्यापर्यंत मर्यादित उरले, किचनपर्यन्त पुढे त्यांना स्थान मिळाले नाही, त्यांची अस्वस्थता वाढत गेली आणि अलीकडे त्यांनी चक्क भाजपचा भगवा खांद्यावर घेतला, गेल्या अनेक वर्षांची काँग्रेसची परंपरा त्यांनी मोडीत काढली, निलय यांना भाजप मध्ये प्रवेश मिळाला.  नजीकच्या काळात झालाच तर राजकीय फायदा होईल तर तो केवळ निलय नाईक यांना, भाजपाला निलय यांच्या पक्षात मध्ये येण्याने कवडीचा देखील फायदा होणार नाही, निलय यांच्यामुळे यवतमाळ किंवा विदर्भातली भरभक्कम बंजारा मते भाजपाला मिळतील असे अजिबात अजिबात होणार नाही, निलय यांना या समाजात नेता म्हणून मान्यता नाही, हवी तेवढी किंमत नाही, आणि हेच नेमके सत्य आहे आणि एखाद्या घराण्यातला पुतण्या फोडून आपला पक्ष या राज्यात फोफावू शकतो असा जर समज भाजप नेत्यांनी करवून घेतला असेल तर त्यांनी राज ठाकरे यांना देखील भाजप मध्ये कसे आणता येईल, त्यावर प्रयत्न करावेत, तसेही त्यांचे राजकीय लग्न जुळत नाही, त्यांना त्यातून आपोआप छान स्थळ चालून येईल....
क्रमश:

No comments:

Post a comment