Tuesday, 11 October 2016

तावडे सर्वांना आवडे 6 : पत्रकार हेमंत जोशी

मुंबईकरांनो, तुम्ही जेव्हा केव्हा सदनिका विकत घेता, तुमच्या इमारतीला 
जोडणारा रास्ता जर ज्याने सदनिका बांधल्या त्याच्या मालकीचा असेल 
तर अशा ठिकाणी शक्यतो सदनिका घेऊ नका कारण बिल्डर सदनिका 
एकदा विकल्या गेल्या कि अशा खाजगी रस्त्यांकडे कधी ढुंकूनही बघत नाही, 
भविष्यात असे रस्ते देखभाल करण्या पैसे टाकायचे कोणी त्यावर रहिवाश्यांचे
एकमत होत नाही आणि रस्त्यांची वाट लागते. मुंबईत अनेक ठिकाणी असे 
खाजगी रस्ते असल्याने तेथील रहिवासी रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशा 
रस्त्यांवरून ये जा करतांना जीव मुठीत धरून कसेबसे दिवस ढकलतात, सदनिका 
विकत घेणे म्हणजे शर्ट बदलणे नव्हे त्यामुळे सामान्य माणूस पैसे टाकून अशी 
डोकेदुखी आयुष्यभर सहन करतो, अशावेळी एखादा दुसराच लोकप्रतिनिधी, 
स्थानिक आमदार या अशा प्रकारात लक्ष घालून खाजगी रस्ते महापालिकेच्या 
ताब्यात देण्यात यशस्वी होतो आणि खाजगी रस्त्यात अडकलेल्या आपल्या 
मतदारांची त्यातून सुटका करतो त्यातलेच एक किंवा एकमेव बोरिवली कांदिवली 
परिसरातील जागरूक आमदार आणि नामदार श्रीमान शिक्षणमंत्री म्हणजेच श्रीयुत 
विनोद तावडे. निवडणुकी आधी जेव्हा तावडेंनी खाजगी रस्ते महापालिकेचा ताब्यात 
नक्की देईन, सांगितले तेव्हा विरोधक त्यांच्या या वाक्यावर फिदीफिदी हसायचे पण 
मतदारांना मात्र माहित होते तावडे जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून त्यांनी 
तावडेंना मुंबईत सर्वाधिक आणि राज्यात द्वितीय, असे मताधिक्य देऊन थोडक्यात 
भरघोस मतांनी निवडून आणले. विशेष म्हणजे मराठी मतदारांची मानसिकता मतदान 
करतांना केवळ विनोद तावडेंना मतदान, हि अशीच बनलेली होती, शिवसेना किंवा 
मनसे किंवा इतर कोणताही राजकीय पक्ष तसेच उमेदवार त्यांना महत्वाचा वाटला नाही, 
अर्जुनासारखे साऱ्या मतदारांचे लक्ष्य केवळ कमळ होते, तावडेंच्या निवडणूक चिन्हावर 
मतदान करणे हेच होते. विनोद तावडे आमदार झाले पुढे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 
नामदार झाले. आणि वचनाला जगले त्यांनी मतदारसंघात बहुसंख्य खाजगी रस्त्यांचे 
महापालिकाकरण करून रहिवाश्यांनी डोकेदुखी दूर केली....
हातभट्टी किंवा देशी पिणाऱ्यासमोर ब्लॅक लेबल आणून ठेवली तर अख्खा खंबा असा 
बेवडा क्षणार्धात रिचवून मोकळा होईल किंवा समुद्र खाडी अगदी सहज पोहून पार 
करतात त्यांना एखाद्या पंचतारांकित हॉटेल मधला स्विमिंग पूल किस झाडकी पत्ती
वाटतो, तावडेंचेही हे असेच थेट अकरावी बारावीला असल्यापासून विनोदजींनी अखिल 
भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र कित्येकदा पिंजून काढला, 
अनेक सभांचे, निवडणुकांचे, मेळाव्यांचे, रथयात्रेचे नियोजन ज्या नेत्याच्या कल्पकतेतून 
अनेकदा यशस्वी ठरले थोडक्यात संघटना बांधणे किंवा वाढविणे म्हणजे विनोद तावडेंना 
सांगणे हे जणू समीकरण भाजप मध्ये ठरलेले त्यामुळे संघटनेच्या समुद्रात अनेकदा 
यशस्वी पाहणारे विनोद तावडे त्यांना बोरिवली मतदार संघ बांधून मतदारांच्या गळ्यातला 
ताईत होणे तसे त्यांच्या दृष्टीने हे थोडे सोपे काम होते, सांघिक नियोजन हा तावडेंच्या 
हातचा मळ, त्यामुळे एकाचवेळी आमदार आणि नामदार म्हणून तावडे लोकप्रियता 
मिळवून मोकळे झाले आहेत, एखाद्या कार्यात स्वतःला मनापासून झोकून देणे त्यांना 
आवडते आणि त्यांच्या या वातावरणमय होण्याच्या वृत्तीचा त्यांना नेहमीच फायदा होतो. 
विद्यार्थी परिषदांच्या महाविद्यालयीन निवडणूक असोत कि निवडणूक असोत विधान 
परिषद विधानसभा किंवा लोकसभेच्या, भाजपने त्यांच्यावर जबाबदारी टाकली नाही 
असे कधी घडले नाही त्यामुळे मधू चव्हाण यांची ती गाजलेली विधान परिषद निवडणूक, 
चव्हाण निवडून येणार नाही सारे म्हणत असतांना त्यावेळी चक्क काँग्रेस फोडली आणि 
मधू चव्हाण निवडून आले, विधान परिषद सदस्य झाले....
अत्यंत महत्वाचे सांगतो, झंझावात मग तो कोणत्याही राजकीय पक्षातल्या विद्यार्थी 
संघटनेचा असो, या राज्यातल्या भाजपच्या विद्यार्थी परिषदेला जसे वसंत भागवत,
प्रमोद महाजन किंवा चंद्रकांत पाटलांनी घडविले, वाढविले त्यातलेच एक म्होरके म्हणून 
या शिक्षण मंत्र्यांचे नाव घेतांना नक्कीच भाजपाला कमीपणाचे वाटणार नाही, अभिमान 
वाटेल. विशेष म्हणजे फडणवीस यांचे डोके बघा केवढे सुपीक, त्यांनी तावडेंना नेमके 
त्यांच्या आवडीचे शिक्षण खाते दिले आणि विद्या ठाकूर यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते 
सोपवले नाही....
विनोद तावडे यांना मी सिनेमातल्या सुलोचना म्हणतो, सिनेमातली नायिका म्हणून 
कधी त्या फारशा कोणाला आठवत नाही तेच विनोद तावडे यांचे म्हणजे ऐन तारुण्यातही 
त्यांना सारे एक बुजुर्ग नेता म्हणून ओळखतात. मला आठवते जयवंतीबेन मेहता यांची 
ईशान्य मुंबईतून त्यांनी लढवलेली लोकसभेची निवडणूक, त्यांच्या विरोधात चक्क नीलम 
गोर्हे उभ्या होत्या आणि जयवंतीबेन यांनी प्रमोद महाजनांना सांगितले, माझ्या निवडणुकीची 
जबाबदारी तुम्ही तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टाका, माझा तावडे आणि विद्यार्थी 
परिषदेवर विश्वास आहे, महाजन हे ऐकून क्षणभर अवाक झाले आणि क्षणाचाही विचार 
न करता तावडेंवर चक्क या आव्हानात्मक निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली आणि 
तावडेंच्या नियोजनबद्ध प्रचारातून जयवंतीबेन निवडून आल्या, म्हणून मी म्हणतोय, तावडे हे 
राजकारणातले सुलोचना, लहान वयात परिपकव राजकारणी....
मी हे म्हणणार नाही कि विनोद तावडे यांचे मार्गदर्शन लाभले नसते तर आमदार पराग आळवणी 
किंवा आशिष शेलार भाजपातले मान्यवर ठरले नसते किंवा आधी नगरसेवक तदनंतर आमदार 
झाले नसते, त्यांचेही राजकीय पाय त्यांच्या घरच्यांना अगदी पाळण्यातच दिसले होते आणि 
शेलार तर आजही तसे नेता म्हणून तावडे यांच्या पंक्तीला येऊन बसले आहेत, या तिघांची 
मैत्री कायम आहे कारण तावडे होते म्हणून राजकीय झेप घेणे सहज शक्य झाले हे पराग 
आणि आशिष यांना एकदम मान्य, विशेष म्हणजे या दोघांना संधी मिळत असतांना तावडे 
त्यांच्यातले शक्ती कपूर अमरीश पुरी थोडक्यात खलनायक ठरले नाहीत आणि तसेही या 
राज्यात अनेक शेलार किंवा आळवणी घडवतांना तावडे यांनी मी केले मी केले असा डांगोरा 
कधी पिटला नाही म्हणून त्यांना राज्यातला मान्यवर नेता अशी उपाधी आपोआप चिकटली.

No comments:

Post a comment