Friday, 28 October 2016

राजकीय दिवाळी कि दिवाळे 2 : पत्रकार हेमंत जोशी

ऐन दिवाळीच्या मोसमात राजकीय फटाके भाजपावाले जोरात फोडण्याच्या मूड मध्ये आहेत असे दिसते. सुरुवातीला असे चित्र निर्माण झाल्यासारखे वाटत होते कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आपापसात अजिबात जमणार नाही, त्यादोघात विस्तवही जाणार नाही किंवा दोघे एकमेकांकडे दात ओठ खात बघतील, प्रसंगी एकमेकांच्या छातीवर बसतील, एकमेकांची डोकी फोडतील, समोरासमोर भेटले कि एकमेकांवर धावून येतील असे वाटले होते पण ते अजिबात घडले नाही आणि आता ते मैदानावर क्रिकेट खेळणारे दोन खेळाडू जसे एकदा सेट झाले कि धावांचा पाऊस पाडून मोकळे होतात तसे आता दोघांचे झाले आहे, त्यांनी एकमेकांना व्यवस्थित समजावून घेतले, मोहन भगवंतांनी त्या दोघात राजकीय नाते घट्ट टिकावे म्हणून जी आजोबाची भूमिका घेऊन एकमेकांना आपापसातल्या वादापासून दूर ठेवले, छान झाले, ते दोघेही सत्तेत आल्यानंतर शनिवारी रविवारी नागपुरात असतांना बहुतेक कार्यक्रमांना एकत्र जातात, एकत्र असतात, एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून कायम तुझ्या गळा माझ्या गळा, गाणे नेहमी गुणगुणतात, नागपूरकर खुश आहेत आणि तसेही जेथे गडकरी आणि फडणवीस, नागपूरकर त्या दोघांच्या प्रेमात आहेत, पक्षभेद विसरून सारे नागपूरकर फडणवीस आणि गडकरींचा जयजयकार करतात, कारण हे दोघे त्यांना मनापासून आवडतात, नागपूरकरांना हे दोघे नेते कमी मित्र म्हणून अधिक जवळचे वाटतात....


सुरुवातीला हे दोघे एकमेकांना राजकारणातून उध्वस्त करण्याचा प्रयत्न यासाठी करतील वाटले होते कारण दोघांची प्रेयसी कॉमन होती, जशी साताऱ्यात उदयसिंह महाराज भोसले आणि अजित पवार या दोघांची प्रेयसी कॉमन होती, जसे कॉमन प्रेयसीमुळे महाराज आणि दादा या दोघांचे अक्षरश: विळ्याभोपळ्याचे सूत होते तेच वातावरण नागपुरातही निर्माण झाल्यासारखे वाटले होते पण सुदैवाने ते घडले नाही, गडकरींनी प्रेयसी मलाच हवी हा हट्ट सोडला आणि स्वतःहुन प्रेयसीचा हात देवेंद्र यांच्या हाती दिल्याने थोडक्यात मोठे मन ठेवून गडकरी यांनी घेतलेली भूमिका देवेंद्र यांना मनापासून गहिवरून गेली आणि वादाचा प्रश्न मिटला. अर्थात हि सत्तेची प्रेयसी होती या राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यावर दोघांचा नक्कीच डोळा होता आणि त्यावर गडकरी यांचा अधिक हक्क होता, वास्तवातली प्रेयसी हा विषय तसाही फडणवीस यांच्यापासून कोसो दूर, जो मुख्यमंत्री पत्नी अमृताकडे देखील क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता म्हणून बघतो, त्याचा आयुष्यत तसाही सुशीलकुमार किंवा अशोककुमार होणे अशक्य....तिकडे साताऱ्याचा प्रेयसीचा विषय मी येथे वर काढल्यानंतर तुम्हा सर्वांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत, तुम्हालाही गुदगुदल्या झाल्या आहेत मला ठाऊक आहे पण उगाच माझ्या लिखाणाचा तिरकस विचार डोक्यात आणू नका , पश्चिम महाराष्ट्रात उदयसिंह महाराज जरी राष्ट्रवादीतर्फे खासदार म्हणून निवडून आलेले असले तरी त्यांना सत्तेच्या प्रेयसीपासून गेल्या अनेक वर्षात अजितदादा यांनी कायम सवतीची वागणूक दिली पण शरद पवार आणि उदयसिंह महाराज भोसले यादोघांत  मैत्रीचे नाते बऱ्यापैकी समजूतदारीचे असल्याने म्हणावा तसा राजकीय भडका या पक्षात आजपर्यंत उडाला नव्हता पण ऐन दिवाळीच्या मोसमात फटाके फुटणार, मुख्यमंत्री दिवाळी संपल्यानंतर आणि हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी राष्ट्रवादीला सुरुंग लावणार हे आता जवळपास नक्की झाले आहे, साताऱ्याचे  महाराज खासदार उदयसिंह महाराज भोसले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुलुख मैदानी तोफ राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री भास्कर जाधव भाजप मध्ये प्रवेश करतील ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे, कोई मायका लाल आता हे 
दिग्ग्ज नेत्यांचे पक्षांतर रोखू शकणार नाही, थोडक्यात साखरपुडा केव्हाच आटोपला आहे, अंगावर अक्षता तेवढ्या पडायच्या बाकी आहेत....
क्रमश:

No comments:

Post a comment