Friday, 7 October 2016

तावडे सर्वांना आवडे 1 : पत्रकार हेमंत जोशी


मुलाचे पाय पाळण्यात ही कहावत आठवली कि अनेक चेहरे 
नजरेसमोर येतात. माझ्या घरी संघाचे वातावरण होते, आई वडील 
दोघेही संघाचे कट्टर होते, शाळेत असतांना एकदा संघ शिक्षा वर्गाच्या 
द्वितीय वर्षाला मी अकोल्याच्या मोहरीदेवी खंडेलवाल शाळेत 
माहिन्याभरासाठी गेलो होतो, एक रुबाबदार तरुण साऱ्यांच्या कौतुकाचा 
विषय ठरला होता, संघ शिक्षा वर्गात आम्हा शाळकरी मुलांपासून तर 
बुजुर्ग संघ नेत्यांपर्यंत, आम्ही सारे त्याला मोहनदादा म्हणत असू आणि 
संधी मिळताच त्याच्या भोवताली घुटमळत असू, आम्हा बालकांना सुद्धा 
तेव्हा जाणीव झाली कि हा रुबाबदार उत्साही तेजस्वी हा तरुण कुछ 
अलग करेगा, घडलेही तेच, आजच्या सरसंघचालकांनी, मोहन भागवतांनी 
पुढे जग दणाणून सोडले...
1990-92 च्या दरम्यान मी शिवाजी मंदिरात आचार्य अत्रे यांचे ब्रम्हचारी हे 
नाटक बघायला गेलो होतो, नाटकातला हिरो, त्याचा अभिनय, त्याचे दिसणे, 
त्याची गायकी, सारेकाही लाजवाब होते, मी त्याच्याशी मुद्दाम ओळख करून 
घेतली, आमची लवकरच छान मैत्री झाली. त्याचा पहिला सिनेमा जेव्हा 
प्रदर्शित झाला तेव्हा तो बेस्ट मध्ये टायपिस्ट म्हणून नोकरी करायचा, बेस्ट 
वसाहतीतच एका खोलीत पत्नी आणि मुलीसह राहायचा, त्याचा पहिला 
सिनेमा प्लाझा मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा मी त्याला माझ्या कारमध्ये 
घेऊन गेलो होतो, परदेशातून मी आणलेले जॅकेट मुद्दाम त्याला घालायला 
दिले होते. बहुतेक फिल्मस्टार प्रोफेशनल असतात, ते असे सहकार्य मुद्दाम 
विसरतात, जे कपड्यासारखे प्रियकर प्रेयसी बदलतात त्यांना मित्रांना 
विसरायला वेळ का म्हणून लागावा ? तो हिरो, त्यावेळेचे माननीय 
राज्यपालांचे सचिव वसंतराव कुलकर्णी आणि मी, असे आम्हा तिघांचे 
त्रिकुट बनले, अनेकदा एकत्र भेटत असू, तो नवखा असूनही मी त्यावेळच्या 
मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने त्याला एक सदनिका मंजूर करवून घेतली, नेमके 
तेच घडले, तो पुढे खूप मोठा झाला, तो प्रशांत दामले होता, त्याचेही पाय 
मला पाळण्यात दिसले होते, प्रशांत आघाडीचा नायक झाला, अर्थात मराठी 
जगत, मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी त्याने पुढे दणाणून सोडली...
अगदी अलीकडे पार्ल्यातल्या श्रीधर अण्णांचे निधन झाले, आत्यंतिक 
समाधानाने त्यांनी जीव सोडला कारण त्यांची मुले कर्तबगार निघालेत. स्वतः 
श्रीधरजी देखील कर्तव्यततप्पर होते, कोकणातील माती आणि माणसे त्यांना 
प्रिय होती, त्यांच्यासाठी वाट्टेल ते, अण्णांचे ध्येय होते म्हणून म्हाडा मधून 
निवृत्त झाल्यानंतर देखील श्रीधरजी गुपचूप बसले नाहीत, त्यांनी कोकणच्या 
सेवेत स्वतःला झोकून दिले अगदी शेवटपर्यंत, आराम करणे जणू त्यांना 
माहीतच नव्हते, समाजसेवा ते एन्जॉय करायचे प्रसंगी घरदार विसरून, नेमके 
समाजसेवेचे बाळकडू त्यांच्या तिन्ही मुलांच्या रक्तात आपोआप भिनले. मोठा 
विवेक त्याने भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपले मानले, 
अभाविप मध्ये स्वतःला ऐन तारुण्यात झोकून दिले, मधला विनोद वडिलांचे 
आणि मोठ्या विवेकाचे हे थोडेसे राजकारण बरेचसे समाजकारण अगदी 
जवळून बघत होता, लीडरशिप तो जवळून अनुभवत होता, आधी शिका मग 
वाट्टेल ते करा, श्रीधरजींची तिन्ही मुलांना सक्त ताकीद होती, शिकता शिकता 
समाजसेवा करण्यास त्यांची हरकत नव्हती म्हणून मोठे विवेक अखिल भारतीय 
विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते, पुढे त्यांना तेवढे सक्रिय राहणे जमले नाही पण 
वडील आणि मोठ्या भावाला निरखून अनुकरण करणाऱ्या विनोदला शाळेत 
असतांनाच वाटायचे केव्हा एकदा महाविद्यालयांत जातो आणि विद्यार्थी 
परिषदेत स्वतःला झोकून देतो, पुढे तेच घडले आजच्या या शिक्षण आणि 
सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री असणाऱ्या श्रीमान विनोद तावडे यांनी अगदी 
आजपर्यंत तेच केले जे त्यांना आवडले, पुन्हा तेच, मुलाचे पाय पाळण्यात, 
पुढे घडलेली किंवा बिघडलेली मुले अनेकदा आपल्याला अगदी लहान वयात 
कळतात, ते नेमके पुढे काय करणार आहेत ते, माझ्याकडे बघून कोणाला 
कधीही वाटले नाही कि मी भविष्यात कधी शास्त्रद्न्य किंवा एखादा मोठा 
अधिकारी होईल, त्यांना जे वाटले तेच माझ्याबाबतीत घडले म्हणजे हा पुढे 
काहीच करणार नाही, साऱ्यांचा अंदाज खरा ठरला जसे अलोकनाथ कडे 
बघून वाटले होते कि हा कधीही अभिनेता होणार नाही, तेच खरे ठरले,
म्हणजे अलोकनाथ सिनेमात आला पण त्याला आजही अभिनय येत नाही,
महेश मांजरेकरांसारखा.....
एक मात्र नक्की विनोद तावडे यांचे नशीब जोरावर आहे म्हणजे ज्या क्षेत्रात 
त्यांना अगदी लहान वयापासून आवड होती, त्याच शिक्षण कला आणि 
सांस्कृतिक खात्याची नेमकी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडावी, याला 
ईश्वरी आशीर्वाद नाहीतर काय म्हणावे....? 
वास्तविक बहुतेकवेळा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर नेमके 
कुठलेलंही ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीकडे नको ते खाते जाते म्हणजे आपल्या 
राज्यातले अतिशय टेक्निकल असे सार्वजनिक बांधकाम खाते खूप वर्षे 
' युवर्स फेथफुली ' च्या वर सही करणाऱ्या म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या 
विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे होते किंवा आजही तीच अवस्था आहे 
राज्याचे हे अत्यंत महत्वाचे खाते टेनिकल शिक्षण न घेतलेल्या चंद्रकांत 
पाटलांकडे आहे पण कधीकधी असे वाटते हे जे घडते तेही ठीक आहे कारण 
छगन भुजबळ स्वतः अभियंते होते त्यामुळे त्यांनी या खात्याचा नेमका दुरुपयोग 
करून घेतला आणि राज्याचे व स्वतःचे बारा वाजवून ठेवले. चंद्रकांत पाटील 
यांचा नक्कीच कधीही पैसे खाण्यात ' भुजबळ किंवा तटकरे ' होणार नाही हे 
नक्की. विनोद तावडे नशीबवान आणि भाग्यवान खरे, त्यांना नेमके आवडीचे 
शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य हे खाते आल्याने अभ्यासू विनोद तावडे हे माजी 
शिक्षण मंत्री बाळासाहेब चौधरी यांच्यानंतर या राज्याला मिळालेल्या उत्तम 
शिक्षण मंत्र्यांपैकी एक, अशी शाबासकीची थाप त्यांना नेहमीच मिळते. अर्थात 
विनोद तावडे यांना जशी शिक्षण क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्याची आवड आहे 
आणि हि खाती त्यांच्याकडे चालून आलीत, अनेक सांगतात, त्यांना मुख्यमंत्री 
देखील व्हायला आवडते, बघूया केव्हा योग्य जुळून येतात ते, बोरिवलीकर 
मतदार बंधू भगिनींनो, तोपर्यंत तावडेंना नियमितपणे विधान सभेवर पाठवा, 
म्हणजे नक्की योग जुळून येईल...
हा अंक हाती पडेपर्यंत फडणवीस सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण 
झालेली असतील, त्यानिमीत्ते छान कामगिरी करून दाखविणाऱ्या काही 
मंत्र्यांवर नेमके लिहून तुमच्यासमोर त्यांची आगळी माहिती मला ठेवायची आहे.

No comments:

Post a comment