Monday, 14 October 2019

लाडावलेली नाही लाडके लाड : पत्रकार हेमंत जोशी

लाडावलेली नाही लाडके लाड : पत्रकार हेमंत जोशी 
प्रसाद लाड फडणवीसांचे हनुमान आहेत, बघता बघता त्यांनी हे थेट फडणवीसांकडे अंगच्या मेहनतीतून अवगत असलेल्या राजकीय कलागुणातून स्वभावातून संभाषणाच्या उत्तम अवगत लकबीतून आणि प्रचंड मेहनत करण्याच्या सवयीतून थेट जवळचा विश्वासू सवंगडी हे नाते निर्माण केले आहे. प्रसाद लाड यांचे भाजपामधले वजन, वर्षा वर असलेला त्यांचा अगदी सहज वावर म्हणजे असे नाही कि भाजपा मध्ये किंवा फडणवीसांकडे येण्यापूर्वी प्रसाद लाड नेता म्हणून झिरो होते आणि फडणवीसांनी त्यांना सवंगडी हनुमान म्हणून जवळ केले त्यातून ते अचानक मोठे झाले, प्रसिद्धीला आले. नाही, प्रसाद आधीही मोठे होते भाजपा मध्ये आले, फक्त पूर्वीपेक्षा अधिक मोठे झाले एवढेच कारण भाजपाने त्यांना काम करण्याची पक्षासाठी मनसोक्त बागडण्याची संधी दिली, लाड यांनी फडणवीसांनी दिलेल्या संधीचे सोने केले. आता हेच प्रसाद लाड तिकडे रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन इत्यादी नेते निवडणूक प्रचारात अतिव्यस्त असतांना इकडे मुंबईत भाजपा मुख्यालयात ठाण मांडून पक्ष प्रचारासाठी, विधान सभा निवडणुकीसाठी नेमके राज्यात साऱ्याच उमेदवारांना काय हवे आहे काय आवश्यक आहे जातीने राबून वरून राज्यभर वेळ मिळताच सर्वत्र जातीने संचार करून सारे काही ठीक चालले आहे किंवा नाही बघताहेत, त्यांच्या भाजपाला आवडणाऱ्या नियोजन करून निर्णय घेण्याच्या क्षमतेचे मोठे कौतुक होते आहे. प्रसाद लाड यांना फडणवीसनेते म्हणून का भावले का मनापासून आवडले त्यांच्याच शब्दात...

“ मला वाटते, सुरवातीला म्हणजे देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांच्या डोक्यात समृद्धी महामार्ग उभारण्याचे आले आणि तेथेच राज्यातल्या विशेषत: प्रस्थापित अनुभवी नेत्यांचे माथे ठणकले आणि धाबे दणाणले, प्रस्थापित नेत्यांच्या ते लक्षात आले कि हा बाबा आता आपली मोनोपली मोडीत काढणार आपले दिखाऊ नेतृत्व खालसा करणार, नेमके पुढे तेच घडले, या पाच वर्षात त्यांच्यावर संकटे आणण्याचे विविध प्रयोग कधी स्वकीयांकडून तर कधी काही प्रस्थापित नेत्यांकडून दरदिवशी व्हायचे पण देवेन्द्रजी मला कुठेही विचलित झाले आहेत घाबरले आहेत त्यांना काही सुचत नाही, असे कधीही दिसले नाही किंवा त्यांनी कोणत्याही संकटात आपले हसू ढळू दिले नाही, ते आलेल्या प्रत्येक आपत्तीतून मार्ग काढायचे मार्ग निघायचे आणि विरोधक हात चोळत बसायचे. नंतर राज्यातल्या साऱ्याच अनुभवी प्रस्थापित बड्या नेत्यांच्या लक्षात आले  कि देवेंद्रजी यांचे नेतृत्व दमदार कसदार कर्तबगार तडफदार दिलदार आहे आपण यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हवे, उगाच आपला इगो जपून राज्याचे आणि आपले नुकसान होईल असे वागणे योग्य नाही, बघता बघता मग जो तो नेता त्यांना भेटायचा आणि यापुढे मला तुमच्या मार्गदर्शना खाली काम करायचे आहे, सांगून मोकळा व्हायचा. दर्यादिल फडणवीसाना ज्यांना जवळ घेता आले त्यांनी त्या सर्वांना मायेने प्रेमाने विश्वासाने मोठ्या मनाने जवळ घेतले...

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगाने जलद गतीने जोडणारा महामार्ग म्हणजे समृद्धी. मी बघितले आहे, त्यांनी कसे झपाटल्यागत निर्णय घेऊन जातीने लक्ष घालून विविध परवानग्या प्रसंगी स्वतः मिळवून केवढ्या तत्परतेने समृद्धी महामार्ग उभारण्याचे मोठ्या पुण्याचे लोकोपयोगी काम सुरु केले. आज जेव्हा केव्हा हा महामार्ग पूर्ण होण्याच्या विविध बातम्या कानावर पडतात, ज्यांना मी राम मानले त्यांचा मी हनुमान केवढा भाग्यवान कि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काम करायची संधी मिळते आहे. ज्या नागपूरला रखडत रखडत जाण्यासाठी तब्बल १६ तास लागायचे त्या ठिकाणी यापुढे केवळ काही महिन्यानंतर केवळ आठ तास लागणार आहेत, ऐकून अंगावर अत्यानंदाचे शहारे येतात.” प्रसाद लाड एकदा का वेळ काढून देवेंद्र फडणवीसांवर सतत बोलायला लागले कि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर मोठ्या अभिमानाने सांगतात. मला त्यांच्या इतर कोणत्याही खाजगी बाबींवर यासाठी बोलायचे नसते कारण त्यावर काही बोलण्यासारखे नाही, असेही प्रसाद लाड आवर्जून सांगतात...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी .

पुन्हा शत प्रतिशत भाजपा :पत्रकार हेमंत जोशी

पुन्हा शत प्रतिशत भाजपा :पत्रकार हेमंत जोशी 
सुपारीच घ्यायची असेल, पैसे उकळण्यासाठी केवळ लिहायचे असेल तर फक्त भाजपा का, इतरही मला त्यांची बाजू घेण्याचे पैसे देतील कारण माझे २० लाख मराठी वाचक हि संख्या कमी नाही त्यामुळे लिखाणाची चर्चा तर होतेच शिवाय सारेच्या सारे वाचक अफलातून, सामान्य वाचक तसे फारच कमी त्यामुळे लिखाणाचा इफेक्ट मोठा होतो पण असे पैसे मिळविण्याची सुपारी घेण्याची मला अजिबात गरज नाही, जे मला जवळून बघतात ओळखतात त्यांना माझी आर्थिक बाजू माहित असल्याने ते तर नक्की त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. सतत ३९-४० वर्षे अतिशय जवळून हे राज्य चालविणारे जे नेते, मंत्री, अधिकारी, मुख्यमंत्री, कंत्राटदार, दलाल, विरोधी पक्षातले, मीडिया  इत्यादी मोजके आहेत, राज्यातल्या त्या प्रत्येकाला मी अतिशय निरखून ओळखून आहे, जे बदमाश आहेत त्यांच्या विरुद्ध सतत लिहितो हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे पण जे लिहितो ते हिमनगाचे एक टोक असते, बरीचशी अस्वस्थता मनातल्या मनात ठेवावी लागते. १९८० ते आजतागायत त्यातल्या त्यात जे बरे राज्यकर्ते होते त्यांचे अपेक्षाविरहित कौतुक केले आणि करीत राहीन. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिमंडळासहित निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यातल्या त्यात आजतागायत राज्याचे कोण भले करणारे तर सतत नजरेसमोर येतात फडणवीस आणि त्यांचे अनेक सहकारी म्हणून राज्याचे भले करणारे फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत यावे त्यासाठी गेले काहीच दिवस माझा हा तोकडा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही कदाचित वेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या नेत्यांना मानणारे असाल त्यामुळे माझे लिखाण कदाचित तुम्हाला अस्वस्थ करणारे असेल पण केवळ राज्याच्या निदान आज तरी हिताच्या दृष्टीने विशेष म्हणजे साऱ्या वर्गातल्या विविध जाती धर्माच्या अगदी मुस्लिमांच्या देखील हितासाठी पुन्हा एकवार सेना भाजपा युती सरकार विशेषतः फडणवीस सत्तेत येणे नक्की गरजेचे आहे ते इतर आधीच्या सत्ताधारयांपेक्षा शतपटीने सध्यातरी खूप चांगले असल्याने त्यांची नेमकी चांगली बाजु अगदी जशीच्या तशी तुमच्यासमोर सतत मांडतो आहे, गोड करून घ्या, मत परिवर्तन नक्की करा जर तुम्ही वेगळ्या विचारांचे असलात तरच...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

दादागिरी लै भारी : पत्रकार हेमंत जोशी

दादागिरी लै भारी : पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या वर्गात ज्या मुली होत्या त्यापैकी एक बावळट वेंधळी दिसायची अभ्यासात फारशी हुशार नव्हती, जी आम्हा मुलांना आवडायची ती आवडण्याचे कारणही असे होते कि एक तर ती श्रीमंत होती, तिचे कपडे मस्त मस्त असायचे, अभ्यासात तर ती हुशार होतीच पण दिसायला नीटनेटकी असल्याने आमच्यासाठी ती सायरा बानो होती, माझ्यासाठी तर स्वप्नांतली राजकुमारी होती, असे वाटायचे मी अमिताभ असावे तिने माझी जया भादुरी व्हावे. पुढे मी शिक्षणानिमित्ते नोकरी आणि व्यवसायानिमीत्ते शहरात निघून आलो, खूप वर्षांनी जेव्हा त्या दोघी गावातल्या कुठल्याशा समारंभात भेटल्या तेव्हा त्या दोघींनाही मी पटकन यासाठी ओळखले नाही कि जी एकदम बावळट होती ती आता गावातली सेक्सी रेखा म्हणून ओळखल्या जाऊ लागली, एकतर तिला श्रीमंत नवरा भेटला होता ती नखशिखांत बदलली होती आणि जी हुशार चुणचुणीत माझ्या स्वप्नातली जया भादुरी  होती तिला व्यसनी नवरा भेटल्याने ती ओळखू येणार नाही एवढी काळवंडली होती, काळजीने गाल आत गेलेले आणि साधे कपडे अंगावर, थोडक्यात अमुक एखाद्याला अंडरएस्टिमेट करायचे नसते, शरद पवारांनी काहीशा साध्या राहणाऱ्या, जमिनीवर पाय टेकून चालणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांना असे विनाकारण अंडरएस्टिमेट केले त्याच पाटलांनी मी दिसतो तेवढा साधा पण माझी राजकारणावर हुकमत कशी, पवारांना दाखवून दिले...

पाच वर्षांपूर्वी जेव्हा फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आले त्यानंतर केवळ काही महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांच्यासारखे शिलेदार अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना विशेषतः पवार गटाला सळो कि पळो करून सोडतील वाटले नव्हते पण ज्यादिलीपकुमार ने राजेंद्रकुमारला कमी लेखले होते त्याच राजेंद्रकुमारला पुढे ज्युबीलीकुमार म्हणून ओळखले जाऊ लागले, पवारांचे फडणवीसांच्या बाबतीत हे असेच झाले पवारांचे राजकारण फ्लॉप ठरले आणि फडणवीस ज्युबीलीकुमर झाले, त्यापाठोपाठ गिरीश महाजन किंवा चंद्रकांत पाटलांसारखे भाजपा नेते देखील विरोधकांना फार वरचढ ठरले. पुण्यातील कोथरूड हा विधानसभा मतदार संघ जसा मोठ्या प्रमाणावर ब्राम्हण मतदारांचा आहे तसा हा मतदारसंघ जगात विविध क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या निष्णात चतुर बुद्धिमान हुशार चलाख मतदारांचा देखील आहे आणि जे बुद्धिमान आहेत त्यांना एवढे तर नक्की माहित आहे कि जसे मेधा कुलकर्णी यांना त्यांनी उत्स्फूर्त निवडून दिले होते त्याचपद्धतीने ते शंभर टक्के त्यांच्या या मतदारसंघाची चौफेर कामे प्रगती उन्नती होण्यासाठी पुन्हा सत्तेत येणाऱ्या चंद्रकांत पाटलांना विजयी करून त्यांच्याकडून विविध विकासाची कामे करवून घेतील. मला वाटते कोथरूड मधल्या मतदारांचे नक्की ठरले आहे, चंद्रकांत पाटलांना भरगोस भरगच्च मतांनी निवडून आणायचे आहे...
क्रमश: हेमंत जोशी

पुणेरी आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी

पुणेरी आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी 
हत्ती आणि चार आंधळे कथेपद्धतीने राजकारणातले काही अर्धवटराव आपापल्या सोयीने पुड्या सोडण्यात स्वतःला धन्य समजतात. आता हि पुडी कोणी सोडली माहित नाही कि फडणवीसाना चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष नात्याने महत्व कमी करायचे होते म्हणून त्यांनीच जाणूनबुजून चंद्रकांत पाटलांना कठीण अशा ब्राम्हणी विधान सभा मतदार संघात मुद्दाम उभे राहण्यास भाग पाडले. वास्तविक ते चंद्रकांत पाटील असतील किंवा दस्तरखुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे अन्य मंत्रिमंडळ किंवा ज्यांचा मंत्रालयाशी सतत संबन्ध येतो अशा सर्वांच्या मेधा कुलकर्णी एक हरहुन्नरी उत्साही हसतमुख ऍक्टिव्ह लोकप्रिय आमदार म्हणून अत्यंत आवडत्या, त्यांचा दांडगा जनसंपर्क त्या पुन्हा निवडून येतील आमदार होतील यात कोणालाही म्हणजे त्यांच्या मतदार संघातील विरोधकांना देखील शंका नसतांना का म्हणून फडणवीसांनी त्या जागेसाठी पायावर धोंडा पाडून घ्यावा, कुलकर्णी यांचे तिकीट  कापणे शंभर टक्के फडणवीसांच्या मनात नव्हते...

पण अलीकडे शरद पवार यांनी भाजपा मधल्या ज्या दोघांना सतत पाण्यात बघितले त्यातले अर्थात एक होते फडणवीस आणि दुसरे होते चंद्रकांतदादा पाटील कारण पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात जेथे जेथे शरद पवार यांचे वर्चस्व होते दादागिरी होती त्यांची मस्ती जिरविण्यात मोलाची महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि ताकदवान सहकारी म्हणून पार पाडली, विशेषतः लोकसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांनी ज्या पद्धतींने पवारांना हैराण वेडे करून सोडले तेव्हापासून पवारांशी यशस्वी पंगा घेणारा ताकदवान नेता म्हणून पाटलांचे कौतुक झाले. व्हायचे काय कि पवार कायम पाटलांना हिणवायचे कि पाटलांनी लोकांमधून निवडणूक लढवून दाखवावी म्हणून चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या पुण्यात त्यांच्या गढीत थेट कोल्हापूरमधून उडी घेतली आणि मेधाताईंना विनंती करून विधानसभा लढविण्याचे ठरविले. आजच लिहून घ्या, चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्या नाकावर टिच्चून किमान एक लाख मताधिक्य मिळवून निवडून येतील, लोकांमधून आमदार होतील...

वास्तविक एकदा नव्हे तर अनेकदा फडणवीस चंद्रकांत पाटलांना म्हणाले होते कि विधानसभा निवडणुकीदरम्यान तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचारात फारसे नसणे माझ्यासाठी अत्यंत ताण निर्माण करणारे हे काम असेल पण पवारांच्या डिवचण्यावर चिडलेले दुखावलेले चंद्रकांत पाटील हट्टाला पेटलेले फडणवीसांना दिसल्याने नाईलाज झाला आणि चंद्रकांत पाटलांनी पवारांना थेट दाखवून दिले कि मी देखील लोकांचा नेता आहे विधानपरिषदेत केवळ मागच्या दाराने येऊन खुर्ची पटकावणारा नेता मंत्री नाही. शरद पवार खूप डिस्टरब आहेत मनातून चिडलेले आहेत त्यांना आता जळी स्थळी केवळ फडणवीस आणि चंद्रकांतदादा दिसू लागले आहेत, पवारांना आता त्यांचा कायम होऊ घातलेला पराभव समोर दिसू लागला आहे म्हणून चंद्रकांत पाटील कसे अस्वस्थ अस्थिर बदनाम होतील त्याकडे पवारांचे पूर्ण लक्ष आहे पण कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बुद्धिमान हुशार मतदाराला दादांचे महत्व आणि पवारांची चाल माहित असल्याने चंद्रकांत पाटलांना विक्रमी मताधिक्याने त्यांनी निवडून आणण्याचे निश्चित केले आहे...
क्रमश: हेमंत जोशी

  

दादा आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी

दादा आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी 
दादा म्हणजे चंद्रकांत दादा, तत्पूर्वी दादा म्हणजे अजितदादा किंवा सुरेशदादा यांचा दादा म्हणून बोलबाला होता, सुरेशदादा संपले, अजितदादा हे केलेल्या चुकांमुळे आणि काकांमुळे जवळपास संपल्यात जमा आहेत. ते ठरल्याप्रमाणे भाजपा मध्ये आले तर टिकतील नाहीतर काका त्यांचाही विजयसिंहदादा मोहिते पाटील करून ठेवतील. ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांचे लक्ष भोजनाने लग्न गाजले होते तेच पाटील आज बऱ्यापैकी आर्थिक डबघाईला आल्याचे माझी माहिती आहे, कारण विजयसिंह मोहिते पाटील काही वर्षे विशेषतः राज्याचे बांधकाम खात्याचे मंत्री होते पण त्यांनी आपला भुजबळ करून न घेतल्याने पुढे त्यांचे खासदार झालेले सुपुत्र रणजितसिंह हे देखील सुसंस्कृत निघाल्याने काकांच्या गटात पक्षात राहून देखील इतरांसारखी अमाप समाप कमाई या बापबेट्याने करून न ठेवल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे माझी माहिती आहे...

www.vikrantjoshi.com

सध्या एकच दादा जोमात जोरात जोशात त्वेषात आहेत, चंद्रकांतदादा पाटील हे ते नाव. कोथरूड पुणे विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवताहेत जेथे ब्राम्हण मतदार फार मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदार संघात ब्राम्हण ज्यांना मतदान करतात तो हमखास निवडून येतो. आधी मेधा कुलकर्णी नावाच्या अतिशय लोकप्रिय नेत्या तेथे आमदार होत्या. त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने पाटलाने  बामनाचे तिकीट कापले असा तेथे अपप्रचार सुरु आहे, ज्या अपप्रचाराला फारसा अर्थ नाही. निवडणुकीनंतर जशी मेधा कुलकर्णी यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने चंद्रकांत पाटील यांना आदेशावरून बहाल केली तशी विधानसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेची चंद्रकांत पाटलांची रिक्त होणारी जागा उमेदवारी फक्त आणि फक्त मेधाताई यांच्यासाठी तेच चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेधाताईंना मिळवून देणार असल्याची माझी शंभर टक्के माहिती आणि खात्री आहे...

आणखी अत्यंत महत्वाचा मुद्दा जो कोथरूड विधान सभा मतदार संघात मुद्दाम केल्या जातो आहे कि चंद्रकांत पाटील यांनी जशी एका बामनाची आमदारकी घालविली ती तशी नामदारकी ते आणखी एका नेत्याची घालविणार आहेत आणि ते नाव आहे देवेंद्र फडणवीस. फडणवीस आणि चंद्रकांतदादा या दोघांचे आपापसातले संबंध अतिशय सुमधुर आहेत, चंद्रकांत पाटील फडणवीसांना थेट धाकट्या सख्य्या भावासारखे मानतात आणि मनापासून सतत साथ देतात त्यामुळे दादा हे देवेंद्र फडणवीसांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत घालवतील आणि पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री होतील हा कोथरूड मतदारसंघात काही विरोधकांनी चालविलेला निव्वळ अपप्रचार आहे, ब्राह्मण मतदारांनी या तद्दन फाल्तुक अपप्रचाराला अजिबात बळी पडू नये असे मी स्वतः अतिशय कडवा ब्राम्हण, ब्राम्हण प्रेमी या नात्याने स्थानिक मतदारांना सांगतो आहे, मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन नक्की होईल तसेच चंद्रकांत पाटील फडणवीसांना शम्भर टक्के फसविणारे नाहीत, जेव्हाकेव्हा फडणवीस आपणहून दिल्लीत राज करायला निघून जातील त्यानंतर मुख्यमंत्री स्पर्धेत चंद्रकांत पाटील हे नक्की अग्रस्थानी असतील, आज मात्र दूरदूरपर्यंत असे त्यांच्याविषयी अपसमज पसरविणे देखील पाप आहे...
क्रमश: हेमंत जोशी 

लाजिरवाणे जगणें : पत्रकार हेमंत जोशी

लाजिरवाणे जगणें : पत्रकार हेमंत जोशी 
काँग्रेस ची अवस्था घनदाट जंगलात हरविलेल्या एकट्या स्त्रीसारखी झाली आहे, बाहेर पडावे तरी कसे अशा गोंधळलेल्या बावरलेल्या अवस्थेत राज्यातली काँग्रेस आहे, कोणीही यावे आणि टपली मारून जावे तसे कोणीही यावे आणि जिंकण्याची अजिबात शक्यता नसतांना देखील तिकीट उमेदवारी घेऊन मोकळे व्हावे ज्या काँग्रेस मध्ये एक काळ असा होता जेथे उमेदवारी मिळविण्यासाठी उड्या पडायच्या, आपापसात मारामाऱ्या व्हायच्या. सुशीलकुमार शिंदे जे म्हणाले आम्ही थकलो आहोत तेच नेमके सत्य आहे, अख्खी काँग्रेस थकली आहे, चार पावले चालू न शकणाऱ्या जक्खड म्हतारीसारखी काँग्रेस ची दयनीय शोचनीय केविलवाणी दीनवाणी अनवाणी अवस्था झाली आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार सांगतो. आमचे पत्रकार मित्र युवराज मोहिते जमा केलेले पैसे खर्च करण्यासाठी गोरेगाव मधून काँग्रेस ची उमेदवारी घेऊन उभे आहेत अर्थात त्यामुळे विद्या ठाकूर या त्यांचा प्रचार फारसा सिरियसली म्हणे यासाठी घेत नाहीत कि मतदारच त्यांना सांगताहेत ताई, घरी जा आणि आराम करा कशाला तुम्ही स्वतः राजकारणातल्या लता मंगेशकर असतांना शाळेच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसमोर गाणं म्हणताहात. त्याही पुढली गम्मत म्हणजे याच युवराज मोहिते यांनी प्रचार पोस्टरवर इंदिरा काँग्रेस च्या नेत्यांना फारसे स्थान न देता थेट दिवंगत मृणालताई गोरे यांचा भला मोठा फोटो टाकला आहे, वापरला आहे. मृणालताई जिवंत असत्या तर यासाठी धायमोकलून रडल्या अस्त्या कि ज्या भ्रष्ट काँग्रेस विरुद्ध लढण्यात मोर्चे काढण्यात त्यांनी अख्खी हयात घालविली त्या काँग्रेस चा प्रचार आज त्यांच्या नावाने होतो आहे अर्थात गोरेगावकर मतदार एवढे मूर्ख नाहीत कि जे मतदार मृणालताई यांच्या विचारांचे आहेत त्यांनी मृणालताईंना नफरत असलेल्या काँग्रेस ला मतदान करून यावे. काँग्रेस च्या पोस्टरवर थेट मृणाल गोरे यांचा फोटो, तो त्या फोटोचा, थेट दिवंगत ग्रेट मृणालताईंचा मोठा अपमान आहे, असे नेमके घडता कामा नये असे घडत राहिले तर उद्या राष्ट्रवादी मधून भाजपा मध्ये आलेले उमेदवार सुप्रिया सुळे यांचा फोटो पोस्टरवर लावून मोकळे होतील...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

कच्चे लिंबू उमेदवार : पत्रकार हेमंत जोशी

कच्चे लिंबू उमेदवार : पत्रकार हेमंत जोशी 
जसे शेख जितू शेख आव्हाड यांच्या मुंब्र्यात त्यांना जणू विचारून शिवसेनेने मुद्दाम कच्चे लिंबूदीपाली सय्यद यांना बळीचा बकरा केले तेच मुंबईत विशेषतः भाजपा उमेदवारांच्या विरोधी उमेदवारांबाबत चित्र दिसते आहे. बहुतेक लढती अशा कि भाजपा उमेदवार विरोधात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला उमेदवार सापडले नाहीत कि त्यांनी जाणूनबजून कच्चे लिंबू उभे केले नेमके कळत नाही. हि चूक करण्याची ती वेळ नाही कि पूर्वी दगड जरी उभे केले तरी ते इंदिरा गांधी नावाच्या करिष्म्यामुळे सहज निवडून यायचे जे अलीकडे नरेंद्र मोदी यांच्या नावाने घडू शकते. सुदैवाने भाजपा कडे उत्तम उमेदवारांची मोठी रेलचेल आहे पण समजा चांगल्या उमेदवारांची यावेळी भाजपाकडे वानवा असती तर मोदी यांच्या नावाने दगड जरी उभे केले असते तरी तेनक्की निवडून आले असते...

मागाठाणे विधानसभा मतदार संघात बलाढ्य प्रकाश सुर्वे यांच्यासमोर नवख्या बाहेरच्या मणिशंकर चौहान यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देणे म्हणजे एखाद्या हाडकुळ्या माणसाने खली यास कडेवर उचलून घेण्याची भाषा करण्यासारखे किंवा कांदिवलीच्या लोकमान्य योगेश सागर यांच्यासमोर कालू बुधेलीया यासी काँग्रेसने उमेदवारी देणे म्हणजे बुधेलीया यांच्या कुटुंब सदस्यांनी देखील सागर यांनाच मतदान करून येण्यासारखे. माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या समोर ज्यांचा आजपर्यंत काँग्रेसशी दूर दूर पर्यंत कधी संबंध नव्हता त्या कट्टर समाजवादी आणि निखिल वागळे यांच्या शिष्याला आमचे पत्रकार मित्र युवराज मोहिते यांना थेट उमेदवारी देणे म्हणजे आजच विद्याताई यांनी सुटकेचा श्वास सोडण्यासारखे किंवा बाळ होण्याआधी जसे हौशी मायबाप लंगोट आणून ठेवतात तसे आजच विद्या ठाकूर  यांनी गुलालाची पोते भरून ठेवावेत...

ज्यांची नावे माहित नाहीत ज्यांची धड मतदारसंघात ओळख नाही, ज्यांचे काही काम नाही अशा जवळपास सार्यां उमेदवारांना युतीच्या विरोधकांनी मुंबईत उमेदवारी ज्या पद्धतीने बहाल केल्या आहेत असे वाटते कोलांट्या उड्या मारणार्या माकडांनी थेट  सिंहिणीला मधुचंद्रासाठी पाचारण केले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमोर सुरेश माने ही काय लढत असू शकते ? पराग अळवणी यांच्यासमोर कोणी जयंती सिरोया, हे तर असे झाले कि एखाद्या सिनेमातून अमिताभ ला काढले आणि कवलजीतला घेतले. निवडणुकांपूर्वीच निवडणुकांचे निकाल असे यावेळचे चित्र आहे. म्हणजे बहुतेक ठिकाणी जवळपास साऱ्याच ठिकाणी युतीच्या उमेदवारांनी बाजारात आत्ताच जावे आणि फटाके घेऊन यावेत, दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करावी. राम कदम यांच्यासमोर कोणी आनंद शुक्ला उभे आहेत मला तर हीच शंका आहे कि राम कदम यांचे विरोधी पक्षात देखील अनेक मित्र असल्याने त्यांनीच हे कच्चे लिंबू मागून घेतले असावे, आघाडीची मोठी शोकांतिका आहे...
हेमंत जोशी